मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मुद्द्यांवरून दिलजमाई? अनेक प्रश्नांवर एकच भूमिका?

BMC Election : मुंबईतील आणि राज्यातील काही मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये एकमत झाल्याचं दिसून येतंय. त्यावरून दोन्ही पक्षांनी एकच लाईन पकडली असली तरी आंदोलनं मात्र वेगवेगळी केली जात आहेत.
मुंबई : मागील काही दिवसांपासून जे काही सामान्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत किंवा मराठी आणि परप्रांतीय वाद निर्माण होत आहे त्यावर राज ठाकरे यांची मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची भूमिका ही जवळपास एकसारखीच पाहायला मिळत आहेत. मग ते एलफिंस्टन ब्रिजचे पाडकाम असो वा मराठी-हिंदी वादावर घेतलेली भूमिका असो, यासह अनेक मुद्द्यावरून आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आता एकच सूर आवळताना दिसत आहे.
कोणत्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये एकमत?
मंगळवारी एलफिंस्टन ब्रिज पाडकामाच्या विरोधात जे आंदोलन झालं यावेळी एलफिंस्टन ब्रिजच्या एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर एलफिंस्टन ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला मनसेकडून आंदोलन करण्यात आलं.
मराठी-हिंदी मुद्द्यावरुन मराठी माणसाच्या पाठीशी
एलफिस्टन ब्रिज आंदोलनच नाही तर मराठी-गुजराती, मराठी-हिंदी वादावर सुद्धा मराठी माणसांच्या बाजूने दोन्ही पक्ष अलीकडच्या काळात उभे राहिलेले पाहायला मिळतात आणि मराठीचा मुद्दा प्रकर्षाने घेताना दोन्ही पक्ष पाहायला मिळत आहे.
बँक आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा आग्रह हा मनसेकडून धरला जात असताना आंदोलन केले जातं आहे. दुसरीकडे मोबाईल कंपनी आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये मराठीचा आग्रह, त्याशिवाय मराठी पाट्यांचा, हॉटेलमध्ये मराठी मेनूंच्या आग्रह मनसे प्रमाणे ठाकरेंची शिवसेना सुद्धा करताना पाहायला मिळत आहे.
औरंगजेबच्या कबरीवरुन एकच भूमिका
एवढेच काय तर औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात जी भूमिका ठाकरे यांच्या शिवसेनेने मांडली तीच भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मांडली. औरंगजेबाची कबर न हटवता तशीच राहू देऊन त्याला मराठी भूमीत गाढलं गेलं हे जगाला कळावं, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम हा जगाला कळवा अशी भूमिका मनसेने मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे भैय्याजी जोशी यांनी विद्याविहार मधील एका कार्यक्रमात गुजराती आणि मराठी भाषेसंदर्भात एक वक्तव्य केलं, त्यावेळी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी भूमिका घेण्यात आली तीच भूमिका राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये मांडली.
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्या पाश्वभूमीवर भाजपने चांगलीच तयारी केली असून कोणत्याही परिस्थिती महापालिकेवर कब्जा मिळवायचाच या दृष्टीने काम सुरू केलंय. त्याचवेळी राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेनेही कंबर कसली आहे.