Abu Azmi Exclusive VIDEO : अबू आझमींचा आडमुठेपणा कायम! म्हणाले, मी काही चुकीचं बोललो नाही

Abu Azmi Exclusive : मी माफी मागितली नव्हती, पण माझ्याकडून कुणी दुखावलं असेल तर माझं वक्तव्य मागे घेतो असं म्हणालो होतो असं अबू आझमी यांनी सांगितलं.
मुंबई : मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केलं. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न सपाचे आमदार अबू आझमी यांनी विचारला. भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात असा आरोपही त्यांनी केला. अबू आझमींनी एबीपी माझाला मुलाखत दिली. औरंगजेबवर केलेल्या वक्तव्यानंतर अबू आझमींना अधिवेशनाच्या काळात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभेतून निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा आडमुठेपणा कायम आहे. आझमी यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाची स्तुती केली. निलंबनानंतर सर्वप्रथम त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यात त्यांनी औरंगजेबाच्या काळात भारताचा जीडीपी सर्वाधिक होता, देश श्रीमंत होता, असे उद्गार पुन्हा एकदा काढले
अबू आझमी म्हणाले की, “महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावं. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही.”
अबू आझमी म्हणाले की, “भाजपला ज्या मुद्द्यातून अधिक मतं मिळतात त्याच मुद्द्यांवरून ते वाद करतात. शिवाजी महाराजांच्या तत्त्वांवर चालत नाहीत. त्यांचा धर्मा-धर्मांमध्ये भांडण लावायची आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा विचारही करु शकत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठेपणाबद्दल अनेकदा बोलले. माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांचा पुतळा बसवणार आहे.”
मी माफी मागितली नाही. मी म्हटलं की माझ्याकडून कुणी दुखावलं असेल तर माझं वक्तव्य मागे घेतो असं म्हणालो होतो असं अबू आझमी म्हणाले.
अबू आझमी हे भाजपची बी टीम आहेत, भाजपच्या सांगण्यावरूनच त्यांनी औरंगजेबवर वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर बोलताना अबू आझमी म्हणाले की, मला जे बी टीम म्हणत आहे ते कधी भाजपसोबत जातील याची खात्री देता येत नाही.
अबू आझमी निलंबित
क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल काढलेले गौरवोद्गार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भोवलं आहे. आझमींवर चालू अधिवेशनापुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. अबू आझमींवरच्या कारवाईचं विरोधकांनी समर्थन केलं. पण त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांवर कारवाई कधी, असा सवालही सरकारला केला. शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आणि सभागृह दणाणून गेलं. कोरकटकरचा मुद्दा चिल्लर असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेहरू आणि जितेंद्र आव्हाडांवरून विरोधकांवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला.