महाराष्ट्र ग्रामीण

बाप रे… विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी कारवाईत 147 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात ड्रग्ज आणि गांजासारख्या अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात ड्रग्सच्या अनेक घटना समोर आल्या असून सांगली जिल्ह्यातही पोलिसांनी ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केल्याचे दिसून आले. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात हे लोन पसरत असून ड्रग्ज (Drugs) व गांजासारख्या पदार्थांची तस्करी केली जात आहे. विठुरायाची पंढरी म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या पंढरी नगरीत देखील मोठा गांजा जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर परिसरात अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याच्या चर्चांना आता पुष्टी मिळाली असून तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 147 किलो गांजा जप्त केला आहे. सध्या तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचे दिसत असताना पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी अमली पदार्थांच्या नेटवर्क ला उध्वस्त केले आहे. पंढरपूर (Pandharpur) येथील अहिल्यादेवी चौकात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नाकाबंदी केल होती.

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स वि फाईव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता गाडीतून उग्र वास येत असल्याचे पोलिसांना जाणवले. त्यानंतर गाडीतील प्रदीप दत्तात्रय हिवरे या माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे राहणाऱ्या तरुणाकडे  विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर, पाठीमागच्या सीटवर असे एकूण तीन पोते गांजा असल्याचे समजले. तसेच, एकूण 72 पाकिटामध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता. सदर गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थित वजन केला असता एकूण 147 किलो ग्रॅम वजनाचा भरला आहे. MH 12 HV 5666 महिंद्रा xuv500 कारमधून हा अंदाजे एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, सदर गाडीतील प्रदीप दत्तात्रय दत्तात्रय हिवरे व त्याचे साथीदार गणेश हनुमंत पवार गणेश, प्रमोद उर्फ सोनू मुळीक यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस NDPS अॅक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर परिसरात अवैध गांजाविरुद्ध आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे, पंढरी नगरीत या कारवाईची मोठी चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button